शैक्षणिक जीवनाचा पहिला दिवस : बालक-पालक आणि शाळा

शैक्षणिक जीवनाचा पहिला दिवस : बालक-पालक आणि शाळा
शैक्षणिक जीवनाचा पहिला दिवस : बालक-पालक आणि शाळा

शैक्षणिक जीवनाचा पहिला दिवस : बालक-पालक आणि शाळा


शिक्षक म्हणून नोकरीच्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून असे लक्षात येते की, इयत्ता पहिलीला शाळेत प्रवेशित झालेली बरेचसशी बालके शाळेत येताना रडत असतात, त्यांना ओढून शाळेत आणावे लागते, शाळेत आले तरी आपल्या आई, वडील किंवा ज्यांच्या सोबत ती शाळेत आली आहेत त्यांनाच बिलगून राहतात, रडतात तेव्हा भेदरलेल्या नजरेने ती शाळेकडे, शाळेतील बाईंकडे, सरांकडे पाहत असतात. तर काही बालक मात्र अगदी उड्या मारत शाळेत येतात, आनंदाने इकडे तिकडे बागडतात. सरांना बाईंना किती बोलू अन किती नको असे वागतात. शिक्षक या नात्याने प्रत्येक शिक्षकांना असा अनुभव येत असावा असे मला वाटते.

शाळेच्या पहिल्या दिवशी भेदरलेली मुले


शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील कधीतरी येणारा किंवा आलेला खूप महत्त्वाचा क्षण असतो. त्या क्षणापासून एक नवी सुरुवात होणार असते, ती सुरुवात छान झाली, चांगली झाली, त्या बालकांना भावली तर त्याचे शाळेतील रमणे, टिकणे आणि शिकणे अवलंबून असते म्हणून शाळेचा पहिला दिवस बालकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण असतो तो सुंदर आनंदी झालाच पाहिजे.


बालकाच्या मनातील शाळेचा पहिला दिवस 

बालक सहा वर्षाचे होत असते, त्याचे शाळेत जाण्याची वेळ होत असते आणि त्याच्या त्याला शाळेत पाठविण्याची चर्चा घरी रंगत असते. काही पालक एखादे बालक घरी खोड्या करीत असेल तर त्याला म्हणतात '...थांब, तुला आता शाळेत पाठवणार आहे...... मग बघ बाई तुला चांगला नीट करतील...शाळेत अशा खोड्या केल्या की चांगले बडवून काढतात....... असे किंवा अशा आशयाची समज काढणारे वाक्ये ते बालक सतत ऐकत असते आणि यातून त्याची शाळेबद्दल, शाळेतील बाईबद्दल एक समज तयार होते की शाळेत खोड्या करणाऱ्या मुलांना आणले जाते आणि खोड्या करीत करू नये म्हणून बडवले जाते.

शाळेच्या पहिल्या दिवशी भेदरलेला बालक


पालक आपल्या बालकांची समज काढण्यासाठी अगदी सहजपणे हे बोलून जातात, विनोद करतात,  त्या विनोदाचा आनंद घेतात पण त्या विनोदाचा बालकाच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचार केला जात नाही. बालकांनी त्याच्या मनात शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल भीतीदायक प्रतिमा मनात तयार केलेली असते आणि हीच ती प्रतिमा जी पहिल्या दिवशी बालकाला शाळेकडे येण्यापासून रोखते. ( ज्यांची पाल्य शाळेच्या पहिल्या दिवशी अशी वागतात त्यांनी आपण कधी शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल भीती वाटेल असे काही बोललो होतो का ते एकदा आठवून पहावे.)


बालकाच्या कोवळ्या मनावर अगदी अजाणतेपणे लहानपणीच भीती बसवली जाते तर पहिल्या दिवशी ते शाळेत जायला आनंदाने कसे तयार होईल. जेथे त्याला शिक्षा मिळणार आहे, जेथे त्याला मनासारखे वागता येणार नाही असे त्याच्या मनावर बिंबवले जाते, तेथे ते जायला तयार होईलच कसे? 


प्रत्येक बालकाला कुटुंबामध्ये शाळे बद्दल असे बोलले जातेच असे नाही. काही कुटुंबातील इतर मोठी मुले शाळेत जातात - येतात, त्यांचा गणवेश, त्यांचे दप्तर, वह्या-पुस्तके यांचेही काही बालकांना आकर्षण वाटते आणि मी कधी शाळेत जाणार अशी त्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते. अशी बालके मात्र शाळेच्या पहिल्या दिवसाची, शाळेत कधी पाऊल ठेवतो याची, कधी मी बाईंना, सरांना भेटतो, कधी मला दप्तर मिळणार, वह्या-पुस्तके मिळणार, गणवेश घालणार आणि मी शाळेत जाणार याची वाट पाहात असते. असे बालक शाळेच्या पहिल्या दिवसापासून शाळेत रमायला लागते.


बालकाचा शाळेतील पहिला दिवस आणि शाळेची भूमिका -


शाळेत आलेला प्रत्येक बालक शाळेत रमला पाहिजे, टिकला पाहिजे आणि शिकला पाहिजे या दृष्टीने शाळेने प्रयत्न करायला हवेत. प्रवेशासाठी शाळेत आलेल्या बालकांच्या मनात शाळेबद्दल भीती आहे की शाळेत येण्यासाठी उत्सुकता आहे ते बाल मानसशास्त्राचा अभ्यास झालेला शिक्षक - शिक्षिका सहज ओळखू शकतात आणि जर असे लक्षात आले की या बालकांच्या मनात शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल भीती आहे तर चटकन त्याच्या मनातील भीती कशी कमी होईल अशी कृती शिक्षकांकडून अपेक्षित आहे‌. त्या बालकांचे आनंदाने स्वागत करणे, त्याला बोलते करण्याचा प्रयत्न करणे, त्याचे मन रमले किंवा शाळेबद्दल असलेला गैरसमज कमी करण्याच्या कृती शाळा व शिक्षकांकडून अपेक्षित आहेत. एकदाका त्याच्या मनातील शाळेबद्दल असलेला गैरसमज निघून गेला आणि त्याला शाळा म्हणजे हसत खेळत आनंदाने शिकण्याचे ठिकाण आहे असे त्याचे शाळेबद्दल मत झाली की त्याचे शाळेत येणे, रमणे आणि शिकणे सोपे होते.

प्रवेशोत्सव जि. प. प्रा. शा वडगाव दादाहरी


आज प्रत्येक शाळा या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसते. बालकाचा शाळेचा पहिला दिवस त्याचे गैरसमज पुसून टाकणारा आणि शाळेबद्दल आस्था निर्माण करणारा असा होताना आता दिसून येतो आहे. शाळेत येणाऱ्या बालकांचे स्वागत प्रत्येक शाळेत मोठ्या उत्साहाने केले जाते. काही ठिकाणी फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून या बालकांना शाळेत आणले जाते. तर काही ठिकाणी पहिल्याच दिवशी गुलाबांचे फुल, चॉकलेट किंवा बिस्किटे देऊन त्यांचे स्वागत केले जाते. त्यांना मनोरंजक खेळ खेळवले जातात, पहिल्याच दिवशी त्यांना पुस्तके दिले जातात, आपुलकीने जवळ घेणारे शिक्षक शिक्षिका यांच्यामुळे शाळेबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता निर्माण होते आणि आनंदोत्सवाने झालेली शिक्षणाची सुरुवात त्यांचे शिक्षण आनंददायी करते.

संतोष सुतार

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2022 संदर्भात महत्वाची माहिती.

 विद्यार्थी मित्र, पालक आणि शिक्षक बंधू भगिनी सर्वांना सस्नेह नमस्कार 🙏😊



आपण सर्वजन नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंतिम निकालाची व निवड यादीची आतुरतेने वाट पाहत आहात आणि यासाठी वारंवार गुगल सर्च करीत आहात. याचा गैरफायदा काही वेबसाइट्स चालक घेत आहेत आणि आपल्याला निकाल घोषीत झाल्याचे सांगत आहेत. वेबसाईट वर निकाल व निवड यादी पाहण्यासाठी लिंक पण दिली जात आहे पण त्यातून कसलीही यादी ओपन होत नाही किंवा कसलाही निकाल पाहायला मिळत नाही त्यामुळे विद्यार्थी व पालक हताश होत आहेत.


माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आम्ही आपला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. निकाल तपासण्यासाठी किंवा निवड यादी पाहण्यासाठी किंवा निकाला संदर्भात कोणतीही अधिकृत सूचना पाहण्यासाठी फक्त जवाहर नवोदय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या, इतर कोणत्याही वेबसाईट वर आपल्याला चूकीची माहीती मिळू शकते.


नवोदय विद्यालयाची अधिकृत वेबसाईट पूढील प्रमाणे आहे.

Https://navodaya.gov.in


या वेबसाईटवर आपणांस योग्य त्या सूचना मिळतील आणि निकाल घोषीत झाल्या नंतर निवड यादी याच वेबसाईट वर पाहायला मिळेल. सध्या या वेबसाईटवर पूढील सूचना पाहायला मिळेल, त्यानुसार निकाल अद्याप घोषित झाला नाही हे समजते.





विद्यार्थी पालक आणि शिक्षक बंधू भगिनींना सूचीत करण्यात येते की अफवा पसरविणाऱ्या वेबसाईट वरील माहिती आपली फसवणूक करणारी असू शकते त्यामुळे अधिकृत वेबसाईट ची मदत घ्या.

निकाल लवकरच घोषित होईल, तशी अधिकृत सूचना वेबसाईट वर येताच आम्ही जिल्हा निहाय निवड यादी आपणांस याच ब्लॉग च्या माध्यमातून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत.

संतोष सुतार, 8600250082


आपलाच जन्म दिवस आणि वाढदिवस यामध्ये किती वर्षाचा फरक असतो?

 

आपलाच जन्म दिवस आणि वाढदिवस यामध्ये किती वर्षाचा फरक असतो?
आपलाच जन्म दिवस आणि वाढदिवस यामध्ये किती वर्षाचा फरक असतो?

आपलाच जन्मदिवस आणि वाढदिवस या मध्ये किती वर्षाचे अंतर असते ?


आपण आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, नातेवाईकांना जन्मदिनानिमित्त भरभरून शुभेच्छा देतो. कार्यकर्ते, चाहते नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठाले बॅनर लावतात त्यात काही जन '......ला वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहितात तर काही जन ....... जन्मदिनाच्या शुभेच्छा लिहितात. आता यात काहीच चुकले नाही पण जेंव्हा आपण तो वाढदिवस किंवा जन्मदिवस कितवा आहे हे लिहून शुभेच्छा देत असतो त्यावेळेस आपणांस हे लक्षात घ्यावे लागेल की ज्या दिवशी आपला जन्म होतो तो आपला पहिला जन्म दिवस असतो त्या दिवसाला आपण पहिला वाढदिवस म्हणत नाही. तर एक वर्षानंतर जेंव्हा पून्हा तीच तारीख येते तेंव्हा त्यावेळी आपल्याला एक वर्ष पुर्ण झाल्यामुळे पहिला वाढदिवस आपण साजरा करतो पण तो असतो आपला दुसरा जन्म दिवस.


म्हणजेच आपलाच जन्म दिवस आणि वाढदिवस यामध्ये एका वर्षाचे अंतर असते हे लक्षात घ्यायला हवे. वाढदिवस आणि जन्म दिवस हे आपण एकमेकांचे पर्यायी शब्द म्हणून जरी वापरत असलो तरी प्रत्येक व्यक्तीच्या जन्मदिनापेक्षा  वाढदिवस हा एक वर्षाने लहान असतो हे लक्षात घ्यायला हवे.


असाच गोंधळ स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याचा वर्धापन दिन यामध्ये होतो हे ही आपण समजून घेतले पाहिजे. 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. तो पहिला स्वातंत्र्य दिन आणि एक वर्षानंतर आपण दूसरा स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्यालाच आपण स्वातंत्र्याचा पहिला वर्धापन दिन असे म्हणतो. 


Independence Day स्वातंत्र्य दिन
Independence Day स्वातंत्र्य दिन


येथेही हे लक्षात घ्यायला हवे की आपण या वर्षी 15 ऑगस्ट 2022 ला जो स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत तो 76 वा स्वातंत्र्य दिन असेल आणि 75 वा वर्धापन दिन. त्यामुळे काही जन शुभेच्छा संदेश लिहिताना असे लिहितील की '76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!' किंवा काही जन असे लिहितील की 'स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!' ... हे दोन्ही शुभेच्छा संदेश अगदी बरोबर असणार आहेत पण ज्यांना स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याचा वर्धापन दिन यातला फरक माहित नसतो त्यांना कोणाचे तरी काही तरी चुकते आहे असे वाटत राहते.

पण हे लक्षात असू द्या स्वातंत्र्य दिन हा स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनापेक्षा एक वर्षाने मोठा असतो.


जन्म दिवस आणि वाढदिवस तसेच स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याचा वर्धापन दिन याबद्दल समज वाढावी यासाठी हा लेख लिहिला आहे. आपल्याला अशा प्रसंगांचा कधी सामना करावा लागला होता का ? किंवा असे आनखी वेगळे काही प्रसंग आपल्या बाबतीत घडले असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा.


... संतोष सुतार

प्रकट दिन हा जन्मदिनाचा पर्यायी शब्द आहे का ?

प्रकट दिन हा जन्मदिनाचा पर्यायी शब्द आहे का ?
प्रकट दिन हा जन्मदिनाचा पर्यायी शब्द आहे का ?

प्रकट दिन हा जन्मदिनाचा पर्यायी शब्द आहे का ?


आज काल आपण सोशल मिडिया वर वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना .... ला प्रकट दिनाच्या शुभेच्छा... असे वापरताना पाहतो. आणि  जन्म दिवस किंवा वाढदिवस यासाठी हा एक पर्यायी शब्द म्हणून बऱ्याचदा वापरताना दिसतो. 

मुळात प्रकट दिन म्हणजे काय ? याबद्दल माहिती नसल्याने तो सर्रास वापरला जात असावा.

ज्या व्यक्तीच्या जन्मा संदर्भात कुठलीही माहिती उपलब्ध नसते त्या वेळी ज्या दिवशी ती व्यक्ती प्रथमतः दिसून आली तो दिवस म्हणजे त्या व्यक्तीचा प्रकट दिन मानला जातो. हा प्रकट दिन शक्यतो संतांच्या बाबतीत लागू पडतो जसे की, संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन माघ कृष्ण सप्तमी हा समजला जातो कारण या दिवशी ते पहिल्यांदा शेगाव नगरीत आढळून आले होते आणि त्यावेळी त्यांचे वय साधारणतः 18 वर्षे असावे. 

गजानन महाराज प्रकट स्थान
श्री संत गजानन महाराज प्रकट स्थान


त्यांच्या जन्माची कसलीही माहिती उपलब्ध नसल्याने ते ज्या दिवशी शेगाव नगरीत आढळले तोच त्यांचा प्रगट दिन म्हणून भक्तगण साजरा करतात. तसेच संत श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया हा साजरा केला जातो ज्या दिवशी ते अक्कलकोट नगरीत आले आले होते आणि तेथेच 22 वर्षे त्यांचे वास्तव्य होते.

प्रकट दिन हा शब्द गजानन महाराज, स्वामी समर्थ आणि ज्यांच्या जन्माच्या संदर्भातील माहिती नसते त्याच्या बाबतीत प्रकट दिन हा शब्द योग्य ठरतो पण आज काल... अमक्याला प्रकट दिनाच्या शुभेच्छा... तमक्याला प्रकट दिनाच्या शुभेच्छा असे शुभेच्छा संदेश देताना दिसतात ते चुकीचे आहे.

आता आपल्याला जन्मदिन आणि प्रकट दिन यातील फरक नक्कीच समजला असेल, किंवा यामध्ये आनखी काही दुरूस्ती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आवश्य आपले मत नोंदवावे.

संतोष सुतार