शैक्षणिक जीवनाचा पहिला दिवस : बालक-पालक आणि शाळा

शैक्षणिक जीवनाचा पहिला दिवस : बालक-पालक आणि शाळा
शैक्षणिक जीवनाचा पहिला दिवस : बालक-पालक आणि शाळा

शैक्षणिक जीवनाचा पहिला दिवस : बालक-पालक आणि शाळा


शिक्षक म्हणून नोकरीच्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून असे लक्षात येते की, इयत्ता पहिलीला शाळेत प्रवेशित झालेली बरेचसशी बालके शाळेत येताना रडत असतात, त्यांना ओढून शाळेत आणावे लागते, शाळेत आले तरी आपल्या आई, वडील किंवा ज्यांच्या सोबत ती शाळेत आली आहेत त्यांनाच बिलगून राहतात, रडतात तेव्हा भेदरलेल्या नजरेने ती शाळेकडे, शाळेतील बाईंकडे, सरांकडे पाहत असतात. तर काही बालक मात्र अगदी उड्या मारत शाळेत येतात, आनंदाने इकडे तिकडे बागडतात. सरांना बाईंना किती बोलू अन किती नको असे वागतात. शिक्षक या नात्याने प्रत्येक शिक्षकांना असा अनुभव येत असावा असे मला वाटते.

शाळेच्या पहिल्या दिवशी भेदरलेली मुले


शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील कधीतरी येणारा किंवा आलेला खूप महत्त्वाचा क्षण असतो. त्या क्षणापासून एक नवी सुरुवात होणार असते, ती सुरुवात छान झाली, चांगली झाली, त्या बालकांना भावली तर त्याचे शाळेतील रमणे, टिकणे आणि शिकणे अवलंबून असते म्हणून शाळेचा पहिला दिवस बालकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण असतो तो सुंदर आनंदी झालाच पाहिजे.


बालकाच्या मनातील शाळेचा पहिला दिवस 

बालक सहा वर्षाचे होत असते, त्याचे शाळेत जाण्याची वेळ होत असते आणि त्याच्या त्याला शाळेत पाठविण्याची चर्चा घरी रंगत असते. काही पालक एखादे बालक घरी खोड्या करीत असेल तर त्याला म्हणतात '...थांब, तुला आता शाळेत पाठवणार आहे...... मग बघ बाई तुला चांगला नीट करतील...शाळेत अशा खोड्या केल्या की चांगले बडवून काढतात....... असे किंवा अशा आशयाची समज काढणारे वाक्ये ते बालक सतत ऐकत असते आणि यातून त्याची शाळेबद्दल, शाळेतील बाईबद्दल एक समज तयार होते की शाळेत खोड्या करणाऱ्या मुलांना आणले जाते आणि खोड्या करीत करू नये म्हणून बडवले जाते.

शाळेच्या पहिल्या दिवशी भेदरलेला बालक


पालक आपल्या बालकांची समज काढण्यासाठी अगदी सहजपणे हे बोलून जातात, विनोद करतात,  त्या विनोदाचा आनंद घेतात पण त्या विनोदाचा बालकाच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचार केला जात नाही. बालकांनी त्याच्या मनात शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल भीतीदायक प्रतिमा मनात तयार केलेली असते आणि हीच ती प्रतिमा जी पहिल्या दिवशी बालकाला शाळेकडे येण्यापासून रोखते. ( ज्यांची पाल्य शाळेच्या पहिल्या दिवशी अशी वागतात त्यांनी आपण कधी शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल भीती वाटेल असे काही बोललो होतो का ते एकदा आठवून पहावे.)


बालकाच्या कोवळ्या मनावर अगदी अजाणतेपणे लहानपणीच भीती बसवली जाते तर पहिल्या दिवशी ते शाळेत जायला आनंदाने कसे तयार होईल. जेथे त्याला शिक्षा मिळणार आहे, जेथे त्याला मनासारखे वागता येणार नाही असे त्याच्या मनावर बिंबवले जाते, तेथे ते जायला तयार होईलच कसे? 


प्रत्येक बालकाला कुटुंबामध्ये शाळे बद्दल असे बोलले जातेच असे नाही. काही कुटुंबातील इतर मोठी मुले शाळेत जातात - येतात, त्यांचा गणवेश, त्यांचे दप्तर, वह्या-पुस्तके यांचेही काही बालकांना आकर्षण वाटते आणि मी कधी शाळेत जाणार अशी त्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते. अशी बालके मात्र शाळेच्या पहिल्या दिवसाची, शाळेत कधी पाऊल ठेवतो याची, कधी मी बाईंना, सरांना भेटतो, कधी मला दप्तर मिळणार, वह्या-पुस्तके मिळणार, गणवेश घालणार आणि मी शाळेत जाणार याची वाट पाहात असते. असे बालक शाळेच्या पहिल्या दिवसापासून शाळेत रमायला लागते.


बालकाचा शाळेतील पहिला दिवस आणि शाळेची भूमिका -


शाळेत आलेला प्रत्येक बालक शाळेत रमला पाहिजे, टिकला पाहिजे आणि शिकला पाहिजे या दृष्टीने शाळेने प्रयत्न करायला हवेत. प्रवेशासाठी शाळेत आलेल्या बालकांच्या मनात शाळेबद्दल भीती आहे की शाळेत येण्यासाठी उत्सुकता आहे ते बाल मानसशास्त्राचा अभ्यास झालेला शिक्षक - शिक्षिका सहज ओळखू शकतात आणि जर असे लक्षात आले की या बालकांच्या मनात शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल भीती आहे तर चटकन त्याच्या मनातील भीती कशी कमी होईल अशी कृती शिक्षकांकडून अपेक्षित आहे‌. त्या बालकांचे आनंदाने स्वागत करणे, त्याला बोलते करण्याचा प्रयत्न करणे, त्याचे मन रमले किंवा शाळेबद्दल असलेला गैरसमज कमी करण्याच्या कृती शाळा व शिक्षकांकडून अपेक्षित आहेत. एकदाका त्याच्या मनातील शाळेबद्दल असलेला गैरसमज निघून गेला आणि त्याला शाळा म्हणजे हसत खेळत आनंदाने शिकण्याचे ठिकाण आहे असे त्याचे शाळेबद्दल मत झाली की त्याचे शाळेत येणे, रमणे आणि शिकणे सोपे होते.

प्रवेशोत्सव जि. प. प्रा. शा वडगाव दादाहरी


आज प्रत्येक शाळा या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसते. बालकाचा शाळेचा पहिला दिवस त्याचे गैरसमज पुसून टाकणारा आणि शाळेबद्दल आस्था निर्माण करणारा असा होताना आता दिसून येतो आहे. शाळेत येणाऱ्या बालकांचे स्वागत प्रत्येक शाळेत मोठ्या उत्साहाने केले जाते. काही ठिकाणी फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून या बालकांना शाळेत आणले जाते. तर काही ठिकाणी पहिल्याच दिवशी गुलाबांचे फुल, चॉकलेट किंवा बिस्किटे देऊन त्यांचे स्वागत केले जाते. त्यांना मनोरंजक खेळ खेळवले जातात, पहिल्याच दिवशी त्यांना पुस्तके दिले जातात, आपुलकीने जवळ घेणारे शिक्षक शिक्षिका यांच्यामुळे शाळेबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता निर्माण होते आणि आनंदोत्सवाने झालेली शिक्षणाची सुरुवात त्यांचे शिक्षण आनंददायी करते.

संतोष सुतार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा