महागडे क्लास करता येत नसल्याने स्मार्टफोनवर अभ्यास करून NEET मध्ये 595 गुण मिळविणारा विनायक ठरतोय विद्यार्थ्यांचा आयडाॅल


 शिकण्याची जिद्द, तळमळ असेल तर त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. परिस्थिती कितीही हालाखीची असो तुमचे ध्येय स्पष्ट असेल आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालू असतील तर एक ना एक दिवस ते ध्येय तुम्हाला प्राप्त होणारच यात शंका नाही.

असाच एक ध्येय वेडा मुलगा म्हणजे विनायक अर्जुन भोसले, परळी तालुक्यातील सेलू सफदराबाद या लहानशा गावचा रहिवासी पण सध्या शिक्षणासाठी अंबाजोगाईत अगदी दहा बाय दहा च्या खोलीत आपली विधवा आई, मोठा भाऊ व एक लहान बहिणीसोबत राहतो. 

वडील स्व. अर्जुनराव भोसले यांच्या अपघाती मृत्यूनंतर विनायक च्या कुटुंबाची ओढाताण सुरू झाली. मुलांचा सांभाळ करून शिकविण्याची जबाबदारी आई सुनिता यांच्यावर येवून पडली. आपल्या मुलांची शिकण्याची तळमळ पाहता त्यांनी माजलगाव गाठले. तेथे एका शाळेत विनायक शिकू लागला तिथेही शिकता शिकता विनायक म्हैस सांभाळत असायचा. आईने सांगितले की शिकायचे असेल तर म्हैस सांभाळून शाळा शिकावी लागेल आणि विनायकने या गोष्टी चा स्विकार केला आणि म्हैस सांभाळून, दूध विकून घराला हातभार लावत शिक्षण चालू ठेवले.अंबाजोगाई हे शहर शिक्षणासाठी चांगले आहे म्हणून या कुटुंबाने अंबाजोगाई गाठली. घरची परिस्थिती हालाखीची, घरात कमावते कोणीही नाही, शिकणारी तीन लेकरं आणि त्यांचं शिक्षण झालं पाहिजे यासाठी धडपडणारी आई सुनिता यांना आपल्या मुलांना शिकविण्याची लोकांच्या घरी धुणे भांडी करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी तो पर्याय निवडला पण मुलांना शिक्षणापासून दूर केले नाही. धुणे भांडी सोबतच त्या काही विद्यार्थ्यांना मेस चे डब्बेही पुरवितात. आईवर पडणारा ताण लक्षात घेऊन मोठ्या मुलगा अंबाजोगाईतील एका दुकानात नोकरी करतो आहे दुसरा मुलगा विनायक आपले डाॅक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिकण्याची धडपड करतो आहे. 

 आज डॉक्टर व्हायचे म्हणजे महागडे ट्युशन लावल्याशिवाय पर्याय नाही. वार्षिक लाखो रूपयांची फिस देण्याची घरची परिस्थिती नसली तरी विनायक ची डाॅक्टर होण्याची तळमळ खुप आहे आणि या तळमळीतूनच विनायकने जिद्दीने NEET चा अभ्यास आपल्या स्मार्टफोन वर चालू केला. काही युट्यूब चॅनल आणि काही ॲंड्राॅईड ॲप्लिकेशन यांच्या मदतीने शिकण्याची धडपड सुरू झाली.

या मार्गाने कोणी यशस्वी झाले आहे का? माहित नाही पण या पद्धतीने अभ्यास केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही म्हणून विनायक रोज दहा-बारा तास स्मार्ट फोनवर अभ्यास करू लागला. आपले स्वप्न साकार करण्यासाठी स्वतः ठरविलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे पुढे पुढे चालत राहिला. दुसरीकडे त्याच्याच वयाची मुले याच स्मार्टफोवर तासंतास गेम्स खेळत बसतात, रिल्स पाहताना, युट्यूब च्या व्हिडिओ पाहून टाईमपास करतात किंवा व्यसन लागावे अशा खेळांमध्ये रंगून जातात त्याच स्मार्टफोनचा वापर हा विनायक स्वतः चे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी करीत होता. 

विनायकने  जून 2022 ची NEET ची परीक्षा दिली आणि नुकत्याच NEET च्या जाहिर झालेल्या निकालात त्याला 720 पैकी 595 गुण प्राप्त झाले आहेत. या गुणाच्या आधारे त्याचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित होवू शकतो यात शंका नाही आणि पुढील वैद्यकीय शिक्षण कमी खर्चात होवू शकते.विनायकचा हा शैक्षणिक प्रवास पाहता तो आता सर्व विद्यार्थ्यांसाठी आयडॉल ठरतो आहे. कारण आपले ध्येय स्पष्ट असेल, त्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग माहित असेल आणि त्या मार्गावर चालण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची जोड असेल तर परिस्थिती कितीही बिकट असो, पैसा असो किंवा नसो, साधणे कमी असोत किंवा जास्त, तुमचे स्वप्न साकारण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही हेच विनायकने सिद्ध करून दाखवले आहे.


याच जिद्दीने, चिकाटीने तो भविष्यात मोठा डॉक्टर होऊन आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलणार आहे आणि आपल्या समाजातील लोकांना वैद्यकीय सेवा देणार आहे. त्याच्या या स्वप्नांना आनखी बळ मिळो याच शुभेच्छा!!!


संतोष सुतार

8600250052

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा